सदानंद नाईक
उल्हासनगर : शहाड येथील रेयाॅन संच्युरी कंपनीचे प्रबंध संचालक अध्यक्ष ओमप्रकाश चीतलांगे यांच्यावर अरुण नावाच्या कर्मचाऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात चीतलांगे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी उल्हासनगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे यांनी दिली.
उल्हासनगर शहाड गावठाण परिसरात रेयाॅन संच्युरी कंपनी असून कंपनीत ५ हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. गुरवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अरुण नावाच्या कामगाराने धारदार शस्त्राने कंपनीचे प्रबंध संचालक अध्यक्ष ओमप्रकाश चितलांगे यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला होताच सुरक्षारक्षक व कामगार यांनी अरुण याला ताब्यात घेतले. याप्रकाराने कंपनीत एकच खळबळ उडाली. उल्हासनगर पोलिस परिमंडळचे सहायक पोलीस आयुक्त डी डी टेळे यांच्यासह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अरुण या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे यांनी दिली आहे. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अनिल व्यास यांच्या सोबत याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त असून कंपनीतील घटने बाबत सविस्तर माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. शुक्रवारी सविस्तर माहिती देतो. असे म्हणाले.
रेयाॅन संच्युरी कंपनीचे प्रबंधक संचालक अध्यक्ष ओमप्रकाश चितलांगे, सुबोध दवे यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. तसेच कंपनी कामगार संघटनेचे पदाधिकारी यांना संपर्क केला असता, कोणीही प्रतिसाद दिला नाही. तर दुसऱ्या एका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत संपर्क झाला. मात्र त्यांनी झालेल्या घटने बाबत जास्त बोलण्यास नकार दिला. तसेच नाव प्रसिध्द करू नका. असे सांगितले. सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे यांनी हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांला राहण्यासाठी निवास (कॉटर्स) स्वस्तात मिळाले नसल्यानें, हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी वेतनात कपात, कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्ती आदी समस्यांनी कामगार नाराज असल्याची प्रतिक्रिया नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर दिली.
शहरात सर्वात मोठी कंपनी
एकेकाळी १० हजार पेक्षा जास्त कामगार असलेल्या रेयाॅन संच्युरी कंपनीत, आजमितीस ५ हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. कंपनी विविध उपक्रम राबवित असून कंपनीने स्थानिक नागरिक व कामगार यांच्यासाठी प्रसिध्द शहाड विठ्ठल मंदिर बांधले आहे. महापालिकेला कर रूपाने कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र लॉकडाऊन दरम्यान कर्मचाऱ्याच्या वेतनात कंपनीने कपात केल्याने, कामगार नाराजी असल्याची प्रतिक्रिया कामगारांनी दिली. मात्र नाव प्रसिध्द करू नका. असे त्यांनी आवर्जून सांगितले.