पूनम अपराज
मुंबई - वरळी नाक्यानजीक असलेल्या भारत मिल संकुलात पती पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. काल सायकांळी ७ वाजताच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षास पती पत्नीचे मृतदेह आढळल्याची माहिती त्यांच्या मैत्रिणीनं दिली. त्यानंतर वरळी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत पतीचे नाव अजय कुमार (३०) तर पत्नीचे नाव सुज्जा एस (३४) असं आहे.
हे दाम्पत्य मूळचे केरळ येथील असून ते फोर्ट परिसरातील एका बँकेत काम करतात. गेल्या ९-१० महिन्यांपूर्वी या दोघांचे लग्न झाले असून वरळी येथील भारत मिल संकुलात भाड्याने राहतात. या दाम्पत्याला एप्रिल - मे २०२१ दरम्यान कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनाचा धसका घेतला होता. त्यातूनच या पती पत्नीने आत्महत्या केल्याचा संशय असल्याचं वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. याबाबत पुढील तपास शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सुरु केला जाईल. पतीचा मृतदेह स्वयंपाकघरात तर पत्नीचा मृतदेह बाथरूम आणि हॉलच्या मधल्या पॅसेजमध्ये आढळला असल्याची माहिती कोळी यांनी दिली.
काल म्हणजेच बुधवारी १२ वाजताच्या सुमारास सुज्जा यांच्या आईने केरळहून तिला अनेकदा कॉल केला. मात्र आपली मुलगी कॉल रिसिव्ह करत नसल्या कारणाने चिंतेत असलेल्या आईने मुलीच्या मैत्रिणीला कॉल केला. ती मैत्रीण देखील मुलगी जिथे राहते त्याच इमारतीत राहते. मैत्रीण सुज्जाच्या घराच्या दरवाजा ठोठावू लागली. पण काही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर शेजारच्यांनी दरवाज्याला धक्का देऊन दरवाजा खोलून रात्री ७ च्या सुमारास घरात प्रवेश केला असता पती - पत्नी मृतावस्थेत आढळले. त्यानंतर १०० नंबरला कॉल करून माहिती देण्यात आली. त्यानुसार वरळी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. मृत पती पत्नीचे भाऊ केरळहून पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांना मृतदेह लवकरच देण्यात येईल असे पुढे कोळी म्हणाले.