Worli News : वरळी येथील NSCI (नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया) क्लबच्या उपकंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजेश तावडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ताडदेव पोलिसांना घटनास्थळी सुसाईट नोट सापडली आहे. सध्या ताडदेव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तावडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, राजेश तावडे यांचे २०-३० लाख रुपये थकल्याने ते तणावात होते म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचे सुसाईट नोटमध्ये नमूद आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात नेण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी येथील लाला लजपतराय मार्गावर असलेल्या NSCI क्लबचे राजेश तावडे हे उपकंत्राटदार होते. पैसे थकवले असल्याने आत्महत्येला प्रवृत्त केले असा आशयाची सुसाईड नोट या आत्महत्या केलेल्या उपकंत्राटदाराने लिहिली आहे.NSCI क्लबच्या बेसमेंटमध्ये तावडे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. राजेश तावडे हा विक्रोळी परिसरात राहत होते. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरु आहे. नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) ही वरळीत एक क्लब आहे. कोरोना काळात या ठिकाणी जम्बो कोव्हिड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. वरळीच्या NSCIच्या डोम सेंटरमध्ये परळच्या टाटा रुग्णालयातील कर्करोग आणि कोरोना या दोन्ही आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या जम्बो कोव्हिड सेंटर रुपांतर आता जम्बो लसीकरण केंद्रात करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी लसीकरण सुरु आहे. तसेच या ठिकाणी लसीकरणासह कोव्हिड रुग्ण उपचारही घेत आहेत.