मुंबई - औरंगाबादेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणावेळी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने डोंगरी पोलीस ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमशेरखान पठाण यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंविरोधात लेखी तक्रार दिली असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.संबंध महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय वातावरण खूप तापले आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करण्यास उधाण आलेले असताना डोंगरी पोलीस ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी हिंदू - मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने वंचितच उमेदवार शमशेरखान पठाण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांना अप्रत्यक्षरित्या हिरवा नाग संबोधित केले. तसेच हिरवा नागाला पाकिस्तानात पाठवून द्या, तिथे त्याची नागपंचमी करा असा समाजात द्वेष निर्माण करणारे वक्तव्य उद्धव यांनी केली असल्याची माहिती शमशेरखान पठाण यांनी दिली. तसेच पुढे ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने कोणत्याही समाजाबाबत, धर्माबाबत टीका करण्याची मुभा दिलेली नसून उद्धव ठाकरे यांनी समाजात धर्मभेद करण्याऐवजी समाजासाठी काय प्रगती केली ते जनतेला सांगावे. या त्यांच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष धोक्यात येऊ शकतो असे पठाण म्हणाले.