मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामागील चौकशी अजूनही सुरूच आहे. वांद्रे पोलिसांकडून आतापर्यंत २५ जणांची चौकशी करण्यात आली असून सुशांतने यशराज फिल्म्सचे साइन केलेले कंत्राट नंतर मोडल्याबाबत यशराज फिल्म्सच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत.
सुशांतने २०१२ मध्ये यशराज फिल्म्सचे चित्रपट कंत्राट साइन केले; जे मोडून तो २०१५ मध्ये त्यातून बाहेर पडला. तेव्हा त्याचे कामकाज दोन वरिष्ठ अधिकारी पाहत होते. त्यांची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत २५ जणांचा जबाब नोंदविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
गळफासात बऱ्याचदा डोळे मिटलेले असतात - तज्ज्ञांचे मतसुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या अर्धवट उघड्या डोळ्यांबाबत फॅन्स आणि मित्रमंडळींकडून संशय व्यक्त केला जात आहे. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र गळफासाच्या प्रकरणात या स्थितीला ‘ला फेस सिमथेमिक’ असे संबोधले जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
याबाबत बोलताना नायर रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले की, गळफासाच्या प्रकरणामध्ये बऱ्याचदा डोळे बंदच असतात. मात्र काही केसेसमध्ये एक डोळा उघडा आणि दुसरा बंद राहतो. याला आम्ही वैद्यकीय भाषेत ‘ला फेस सिमथेमिक’ स्थिती असे म्हणतो. मात्र ही बाब फारच सामान्य असून त्यानुसार यात काही संशयास्पद आहे, असे म्हणता येणार नाही.सुशांतच्या पायाखाली स्टूल होता का, ज्याच्या मदतीने त्याने फास बांधला आणि नंतर त्याच्या मदतीने गळफास घेतला ही बाब घटनास्थळी पोलिसांनी काही फोटो काढले असल्यास लक्षात येईल. ते नसल्यास सदर व्यक्ती व सिलिंगची उंची किती? तसेच त्याने फास नेमका कुठे बांधला? यासारख्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून निष्कर्ष काढता येतो. त्यासाठी घटनास्थळाचा पंचनामा अत्यंत महत्त्वाचा ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.