झारखंडच्या पलामूमध्ये प्रेम, मैत्री आणि फसवणूक यांनी भारावून टाकणारी एक भयानक घटना समोर आली आहे. जिथे 'शोले' चित्रपटातील जय-वीरूसारखे मित्र असलेल्या दोन तरुणांनी एकत्र आत्महत्या केली. त्यापैकी एकाची प्रेमात फसवणूक झाली होती. त्यामुळे तणावाखाली तो आत्महत्या करणार होता. शेवटच्या क्षणी त्याने आपल्या मित्राला संपूर्ण गोष्ट सांगितली. मग काय, त्या मित्रासोबतच दुसऱ्या तरुणानेही स्वत:चा जीव संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.ही घटना पलामूच्या नोदिहा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चराई-2 ची परिसरातील आहे. मंगळवारी या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सुद्दू भुयान आणि रामजन्मा अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.मृत्यू झालेल्या दोन तरुणांपैकी एक अपंग असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेमात फसवणुक झाल्यामुळे ही संपूर्ण घटना घडली आहे. सुद्दू भुयान नावाच्या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. मुलीने मुलाशी संबंध तोडले. या घटनेने सुद्दू खूप तणावात होता. याबाबत त्याने त्याचा अपंग मित्र रामजन्मालाही सांगितले.
सुद्दूने त्याच्या मित्र रामजन्माला सांगितले की, त्याला आता जिवंत राहायचे नाही. तो गळफास घेऊन आत्महत्या करणार आहे. मित्राचा हा निर्णय ऐकून रामजन्मानेही त्याच्यासोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रामजन्मा जेवण खाल्यानंतर ते साडी घेऊन घराबाहेर पडले. दोघेही निर्जन ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी एकत्र झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.एसएचओ रंजीत कुमार यांनी सांगितले की, याआधीही सुद्दूने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र तो वाचला होता. छतरपूरचे इन्स्पेक्टर वीर सिंग मुंडा यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.अनेकदा शोलेचे गाणे गुणगुणायचेस्थानिक लोकांनी सांगितले की, दोन्ही तरुणांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. रामजन्मा ट्रायसायकलवर चालत असे. सुद्दु अनेकदा त्याची सायकल ढकलत असे. हे दोघेही शोले चित्रपटातील 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर...' हे गाणे गायचे. आपण एकत्र जगू आणि सोबतच मरू, ही गोष्ट या दोघांनी अनेकवेळा गावातील लोकांसमोर मांडली होती. अखेर हे खरे ठरले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.