नाशिक - जिल्ह्यातील येवला येथील प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याने तहसिल आणि महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेनं याबाबत एक व्हिडिओ बनवून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना पाठवला होता. त्यानंतर, चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारला जाब विचारला होता. याप्रकरणी आता गुन्हा नोंद झाला आहे.
येवला येथील प्रांताधिकारी सोपान सुतार यांनी बदलीस पात्र नसतानाही नियम मोडून महिला तलाठ्याची बदली केली होती. या बदलीविरोधात महिला तलाठ्याने मॅट कोर्टात धाव घेतली. त्यावर, 23 ऑगस्टपर्यंत या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडेही महिलेने तक्रार केली होती. महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आता संबंधित प्रांताधिकाऱ्याविरुद्ध विनयभंग आणि दमदाटीचा गुन्हा दाखल झाला आहे.