येरवडा - अवघ्या वर्षभरापूर्वी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून पुणे शहर पोलीस दलात महिला पोलीस निरीक्षक म्हणून त्या रुजू झाल्या. येरवडा पोलीस स्टेशन येथे येऊन पंधराच दिवस पूर्ण केलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांना "जागतिक महिला दिना"निमित्त येरवडा पोलीस स्टेशनच्या प्रमुख "इन्चार्ज" वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एक दिवसाची जबाबदारी देण्यात आली होती. महिला दिनाच्या निमित्ताने स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली ही संधी उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी यशस्वीपणे पार पाडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
सोमवारी (8मार्च )रोजी सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांना महिला दिनानिमित्त एक दिवस इन्चार्ज म्हणून पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळायची जबाबदारी सोपवली. स्वतःच्या खुर्चीत बसून वरिष्ठ निरीक्षकांनी त्यांना "चार्ज" दिला.सर्वप्रथम सकाळी पोलीस स्टेशन हजेरी वर जाऊन त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजाबाबत सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस स्टेशन आवारातील लॉकअप मधील आरोपींची माहिती घेतली. ठाणे अंमलदार यांच्याकडून रात्री उशिरा नंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांची व इतर आवश्यक माहिती घेतली. त्यानंतर हद्दीतील पेट्रोलिंग करता त्या रवाना झाल्या. पेट्रोलिंग दरम्यान नाकाबंदी तसेच मास्क कारवाईची देखील त्यांनी माहिती घेतली. राजीव गांधी हॉस्पिटल येथील आरोग्य सेविकांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुन्हा पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार अर्ज तसेच इतर कामानिमित्त पोलीस स्टेशनला आलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांचे शंकासमधान केले. दुपारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी त्या रवाना झाल्या. बैठकी वरून आल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशन येथे महिला महिला दिनानिमित्त आयोजित संस्था-संघटना यांच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. महिला दिनाच्या निमित्ताने येरवडा पोलीस स्टेशन चा कारभार एक दिवस सांभाळण्याची जबाबदारी नवनियुक्त महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी यशस्वीपणे पार पाडली. जागतिक महिला दिनानिमित्त येरवडा सारख्या मोठ्या पोलिस स्टेशनच्या "इन्चार्ज" म्हणून पोलीस स्टेशन सांभाळण्याची जबाबदारी देण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे तसेच येरवडा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केले.
अवघ्या चोवीस तासाच्या आत त्यांनी जोडला एक संसार.... महिला उपनिरीक्षक स्वाती ठाकूर येरवडा पोलिस स्टेशन येथे महिला सेलचे काम पाहतात. एका उच्चशिक्षित तरुणीने दिलेल्या तक्रार अर्जावरून त्यांनी समुपदेशन व कारवाई करत एक संसार यशस्वीपणे जोडला. एकाच उच्चभ्रु कंपनीत काम करणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रेमसंबंध होते. परंतु त्या तरूणाने तरुणीला लग्नाला नकार दिला होता. पीडित तरुणीने येरवडा पोलिसांकडे याबाबत तक्रार अर्ज दिला होता. पोलीस उपनिरीक्षक ठाकूर यांनी सदर तरुणाला रविवार 7 मार्च रोजी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. दोघांचेही समुपदेशन करून तरुणाला कायदेशीर कारवाईची माहिती दिली. त्यानंतर तरुणाने तरुणीचा स्वीकार करीत जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह केला. पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षपणामुळे तरुणीला तात्काळ न्याय मिळाला. तरुणाला चूक सुधारण्याची संधी मिळाली. कायदेशीर कारवाई टाळून अवघ्या चोवीस तासाच्या आत एक संसार सुरू झाला. याप्रकरणातील तरुण-तरुणींनी येरवडा पोलिसांचे आभार मानले.