मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर या तब्बल ४२ कंपन्यांच्या संचालक असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीतून समोर येत आहे. यापैकी बहुतांश कंपन्या गुंतवणुकीसाठी उघडण्यात आल्या. या कंपन्यांमध्ये दिवान हाउसिंग फायनान्स कंपनीकडून बांधकाम कर्ज म्हणून ६०० कोटी रुपये मिळाल्याचेही चौकशीत समोर आले. त्यानुसार, पत्नी बिंदूसह त्यांची मुलगी रोहिणीकडेही ईडी कसून चौकशी करीत आहे.
येस बँक आणि डीएचएफएलमध्ये ३ हजार ७०० कोटी रुपयांचा कर्ज व्यवहार झाला. त्यानंतर डीएचएफएल आणि राणा यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीमध्ये डीएचएफएलकडून बांधकाम कर्ज म्हणून ६०० कोटी रुपये आल्याचे दिसून आले. तसेच मॉर्गन क्रेडिट, येस कॅपिटल (इंडिया), डोल्टसह आरएबीच्या कंपन्यांमध्ये राणा कपूरही बिंदूच्या बरोबरीने कारभार पाहत होते. त्यांच्या अनेक कंपन्या या केवळ नावापुरत्या असून, त्यामार्फत पैशांचे व्यवहार होत असल्याचा संशय ईडीला आहे. त्यानुसार, संबंधित कंपन्यांबाबत अधिक चौकशी सुरू आहे; तसेच सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांत यापैकी काही कंपन्यांचा समावेशदेखील आहे. त्याचबरोबरीने मुलगी रोहिणीच्या नावावर असलेल्या डू इट कंपनी आणि डीएचएफएलमधील गैरव्यवहार समोर आला.दिल्लीत ३ बंगलेईडीकडून रोहिणीकडेही चौकशी करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात दोघींचा सहभाग समोर येताच त्यांच्यावरही अटकेची कारवाई होऊ शकते, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच परदेशातील मालमत्तेसह दिल्लीत कपूरचे तीन बंगले असल्याची माहितीही ईडीच्या हाती लागली आहे.