मुंबई - हजारो कोटीचा बँक घोटाळा करुन खातेदारांना आर्थिक संकटात टाकलेल्या येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याची पत्नी बिंदू कपूरसह तिघाजणांविरुद्ध केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय) आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अमृता शेरगिल याच्या बंगल्याच्या व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा सहाय्यक गौतम थापर याच्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, राणा कपूर गेल्या रविवारपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असून सोमवार (दि. १६) कोठडीची मुदत आहे. रिझर्व्ह बॅँकने येस बॅँकेवर निर्बंध आणल्यानंतर ईडीने ६ मार्चला राणा कपूर याच्या वरळीतील समुद्र महल येथील फ्लॅट व कार्यालयावर छापे टाकले होते. त्याच्याकडे जवळपास ३० तासाच्या चौकशीनंतर गेल्या रविवारी पहाटे ईडीने अटक केली आहे. त्यानंतर सीबीआयनेही धाड सत्र घातले. त्यांच्या तीनही मुलींकडे कसून चौकशी सुरु असून देश सोडून न जाण्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली आहे. सीबीआयने टाकलेल्यां छाप्यामध्ये अमृता शेरगिल यांच्या थकीत कर्जाप्रकरणी बॅँकेने त्यांचा बंगला जप्त केला होता, मात्र त्याचा रितसर लिलाव न करता तो त्यांनी स्वत: साठी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कपूर दाम्पत्य व त्यांचा सहाय्यक गौतम थापर यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला. यापूर्वी त्याने अनिल अंबानी, दिवान हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनच्या (डीएचएफएल)प्रमुख कपिल वाधवान, यांना बेकायदेशीरपणे कर्ज दिले. वाधवानने ही रक्कम गँगस्टर इकबाल मिर्ची याच्या मालमत्ता विक्रीच्या व्यवहारात वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने आठ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Yes Bank : कपूर दाम्पत्यावर सीबीआयचा आणखी एक गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 8:00 PM
अमृता शेरगिलच्या बंगला व्यवहारात घोटाळा
ठळक मुद्देकपूर दाम्पत्यासह त्यांचा सहाय्यक गौतम थापर याच्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.वाधवानने ही रक्कम गँगस्टर इकबाल मिर्ची याच्या मालमत्ता विक्रीच्या व्यवहारात वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने आठ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.