भोपाळ : येस बँकेवर महिन्याभराचे निर्बंध लादले गेले आहेत. संस्थापक राणा कपूरला त्याच्या मुलीसह अटक करण्यात आली. यावर सहसंस्थापक असलेल्या दिवंगत अशोक कपूर यांच्या मुलीने बँकेच्या अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर माझे बाबा मुंबई हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या गोळीची शिकार झाले नसते तर आज येस बँकेची ही हालत झाली नसती, अशी खंत व्यक्त केली.
अशोक कपूर य़ांच्या मृत्यूनंतर राणा याने अशोक यांच्या परिवाराला बँकेपासून लांब ठेवण्याचे खूप प्रयत्न केले. यानंतर न्यायालयीन लढाई लढत अशोक कपूर यांची मुलगी शगुन कपूर यांना बँकेच्या मंडळावर सहभागी होता आले. दैनिक भास्करने शगुन यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्यांनी बँकेच्या अवस्थेला 26/11 ला झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्य़ाला जबाबदार धरले आहे.
माझा आणि कुटुंबाचा विश्वास आजही बँकेवर आहे. यामुळे आम्ही बँकेतील 8.5 टक्के हिस्सा विकला नाही. आम्ही ही बँक पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. बँकेचे एस्क्रो अकाऊंटमध्ये 3600 कोटी रुपये आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांना पैसे मिळण्यास मदत मिळणार आहे. येस बँकेची मूळ कल्पना ही अशोक कपूर यांचीच होती. त्यांनीच बँकेला सुवर्णकाळ दाखविला. ते आज हयात असते तर बँक अडचणीत सापडली नसती. बँकेच्या कामात झालेले गैरधंदे त्यांनी कधीच करू दिले नसते, असे शगुन यांनी सांगितले.
कसाबने केलेल्या हल्ल्यात अशोक कपूर यांचा मृत्यू2008 मध्ये अशोक कपूर हे बँकेचे नॉन एग्झिक्यूटिव्ह चेअरमन होते. त्यांची बँकेमध्ये 12 टक्के भागीदारी होती. 26 नोव्हेंबरला पतीन मधू यांच्यासह ते नरीमन पॉइंटवरील ट्राय़डेंट हॉटेलच्या कंधार रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले होते. याचवेळी अशोक यांनी फोन करून शगुन यांना टीव्ही सुरू करायला सांगितला. शगुन यांनी दहशतवादी हल्ल्याची दृष्ये पाहून परत त्यांना फोन केला मात्र त्यांनी तो फोन उचललाच नाही. कदाचित त्यांना तेव्हाच दहशतवाद्यांनी गोळी घातली होती. यानंतर मधू यांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले होते. यानंतर राणा याने शगुन यांना तिच्या वडिलांची जागा देण्यास नकार दिला होता. मोठ्या कायदेशीर लढ्यानंतर 2019 मध्ये शगुन यांना संचालक मंडळावर घेण्यात आले.