मुंबई - येस बॅँकेच्या हजारो कोटीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची गुरुवारी कसून चौकशी केली. सुमारे सात तासाहून अधिक काळाहून अधिक काळ ते ईडीच्या कार्यालयात असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरु होती. अंबानी समूहाच्या विविध नऊ कंपन्यांना देण्यात आलेल्या १२ हजार ८०० कोटी थकीत कर्जाच्या अनुषंगाने त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
गुरुवारी चौकशी पूर्ण न झाल्यास अंबानी यांना आवश्यकतेनुसार पुन्हा पाचारण केले जाईल, त्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ईडीतील सूत्रांकडून स्पष्ट झाले. दरम्यान, शुक्रवारी एस्सेल सूमहाचे अध्यक्ष आणि झी समूहाचे माजी अध्यक्ष सुभाष चंद्रा,यांना हजर रहाण्यास सांगण्यात आल्याचे समजते. दरम्यान, बॅँकेचे सहसंस्थापक राणा कपूरची कोठडीची मुदत शुक्रवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
येस बॅँक तोट्यात जाण्यामागे कारणीभूत असलेल्या एक मोठे थकीत कर्जदार अंबानी यांना गेल्या शुक्रवारी ईडीकडून चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. त्यांना सोमवारी कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने दोन दिवसांची मुदत मागितली होती. त्यानुसार गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अनिल अंबानी दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या चौकशीच्या रुममध्ये नेण्यात आले. येस बँकेकडून अंबानी समूहाने घेतलेली कर्जे, त्यासाठी सादर केलेली कागदपत्रे, कपूर यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेल्या रक्कमा, कर्जाची परतफेड न करणे आदीकारणाबाबत त्यांच्याकडे विचारणा करुन त्यांचा जबाब नोंदविण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तपशीलवार माहिती घेण्यात येत असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती.
येस बँकेच्या आर्थिक नुकसानीमागे सहसंस्थापक राणा कपूर प्रमुख जबाबदार असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. त्याने विविध उद्योगसमूह व कंपन्यांना आपल्या अधिकारात जवळपास ३ हजार कोटीचे कर्ज वाटले. त्याच्या बदल्यात स्वत: व मुलीच्या नावावर मोठ्या स्वरुपात लाच घेवून ही रक्कम परदेशी बॅँकातील खात्यामध्ये वळविली असल्याचे ईडी व सीबीआयच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्याच्याविरुद्ध मनी लाऊण्डरिंगचा गुन्हा दाखल केला असून त्याने रिलायन्स, एस्सेल ग्रुप, डीएचएफएल, व्होडाफोन या मोठ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्जे दिली होती. त्याची मुदतीमध्ये परतफेड न झाल्याने बॅँक तोट्यात गेली आहे. आठ मार्चपासून ईडीच्या अटकेत असलेल्या राणा कपूर याची कोठडीची मुदत शुक्रवारी संपत आहे. त्याला उद्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल, राणा कपूरची पत्नी बिंदू व त्याच्या तीन कन्याही चौकशीच्या रडारवर असून त्यांनाही लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. सीबीआयनेही त्यांच्याविरुद्ध अफरातफरीचे गुन्हे दाखल केले आहेत.