मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याला विशेष पीएमएलए न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली. डीएचएफएल प्रकरणी ईडीने मार्च २०२० मध्ये अटक केली होती. ईडीने ताबा घेईपर्यंत राणा कपूर तळोजा कारागृहात होता.
एचडीआयएलची दुसरी कंपनी मॅकस्टरप्रकरणी ईडीने राणा कपूरविरोधात आणखी एक ईसीआयआर नोंदविला आहे. त्यात आणखी दोन आरोपींचा समावेश आहे. मदन गोपाळ चतुर्वेदी आणि मेहुल ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत. मेहुल ठाकूर हा राज्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आहे. जयेंद्र ठाकूर ऊर्फ भाई ठाकूर यांच्या घरी व विवा ग्रुपच्या कंपनीवर छापा टाकल्यावर ईडीने मेहुल ठाकूर व मदन गोपाळ चतुर्वेदी यांना २३ जानेवारी रोजी अटक केली. चतुर्वेदी व ठाकूर यांची चौकशी केल्यावर या प्रकरणाशी राणा कपूर याचा संबंध असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली.मॅकस्टरही एचडीआयएलचीच कंपनी आहे. मॉरिशसच्या एका कंपनीच्या मालकांनी व एचडीआयएलने ही कंपनी स्थापली आहे. मॉरिशसच्या कंपनीची ७९ टक्के भागीदारी मॅकस्टरमध्ये आहे.
उर्वरित भागीदारी एचडीआयएलची आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, एचडीआयएलने येस बँकेकडून २०३ कोटी रुपयांचे कर्ज घेताना त्यांची संपत्ती बँकेकडे तारण ठेवली. हे कर्ज नवीन प्रॉपर्टीच्या दुरुस्तीसाठी वापरले. मात्र, याची काहीही आवश्यकता नव्हती. हे कर्ज मुद्दाम उचलण्यात आले आणि एचडीआयएलचे कर्ज फेडण्यासाठी हे पैसे वापरले.