मुंबई - हजारो कोटींचा कर्ज घोटाळा करुन बँकेच्या खातेदारांना अडचणीत आणलेल्या येस बँकेचा संस्थापक राणा कपूर आणि त्याची पत्नी व मुली आता केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) रडारवर आल्या आहेत. आर्थिक अपहारप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुंबईत सात विविध ठिकाणे छापे टाकून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त केले. दरम्यान, राणा कपूर याच्या ईडी कोठडीची मुदत बुधवारी संपत असून पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याची मुदत वाढवून घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
येस बँकेतील खातेदारांनी गुंतवलेली निधीतील फायदा राणा कपूर याने मुलीच्या नावे स्थापन केलेल्या कंपन्यांकडे वर्ग केल्याचे आतापर्यतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तीनही मुली तपास यंत्रणेच्या रडार आल्या आहेत. सीबीआयने सोमवारी डीएचएफएल कार्यालय, सेनापती बापट मार्ग व एल्फिन्स्टन रोडवरील डीओआयटी अर्बन व्हेंचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची दोन कार्यालये तसेच कपूर यांचे वरळी निवासस्थान, वांद्रे पश्चिमेत कपिल वाधवन यांचे फ्लॅट नरिमन पॉईंट येथील राखी कपूर टंडन हिचा फ्लॅट, नरिमन येथील राधा कपूर खन्ना यांच्या फ्लॅटवर एकाचवेळी छापे मारले.
सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये कपूरची पत्नी बिंदू कपूर आणि तीन मुलींसह सात कंपन्या आणि अज्ञात अशा पाच कंपन्याचा समावेश आहे. दीवान हाउसिंग फायनान्स कॉपोर्रेशन लिमिटेड (डीएचएफएल) चे प्रवर्तक कपिल वाधवन आणि डीएचएफएलशी संबंधित कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक धीरज राजेश कुमार वाधवन यांचाही आरोपी म्हणून समावेश केला असून त्यांचे फ्लॅट व कार्यालयाच्या झडतीचे काम मंगळवारीही सुरु होते.
"26/11 हल्ल्यात बाबा गेले नसते तर आज Yes Bank ची ही हालत झाली नसती"
'YES BANK लुटणाऱ्या उद्योजकांकडून भाजपाला कोट्यवधींचं डोनेशन', 'आप'ने दाखवली यादी
Yes Bank : राजीव गांधींचे 'ते' अती महागडे पेंटिंग अखेर ईडीच्या ताब्यात; राणा कपूरच्या होते मालकीचे
दरम्यान, कपूर यांची भारतात आणि परदेशात प्रचंड संपत्ती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्लीतील अमृता शेरगील मार्गावर राणा कपूर यांच्या मालकीचा तब्बल ३८० कोटींचा बंगला असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. हा बंगला गौतम थापर या कर्जदाराने येस बँकेत गहाण ठेवला होता. मात्र कर्जफेड शक्य न झाल्याने थापर यांनी तो विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र राणा कपूर यांनी तो बंगला बळकावला असल्याची चर्चा आहे. त्यासाठी पत्नी बिंदू कपूर यांच्या नावे बनावट कंपन्या स्थापन करून त्याद्वारे हा बंगला विकत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१७ मध्ये बिंदू कपूर यांच्या ब्लिस अडोब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा बंगला ३८० कोटींची सर्वाधिक बोली लावून विकत घेतला होता.त्यामुळे या बंगल्याचा व्यवहाराची 'ईडी'कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ब्रिटन आणि फ्रान्समध्ये आलिशान घरेराणा कपूर यांनी भारतातच नव्हे तर परदेशातही स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. राणा कपूर यांचे एक घर मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारती शेजारी आहे. इंडियाबुल्सच्या एका प्रोजेक्ट्मध्ये त्यांचे ८ ते ९ फ्लॅट आहेत. दिल्लीत ३८० कोटींचा बंगला आहे. शिवाय अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये स्थावर मालमत्ता आहे.