मुंबई : टीआरपी घोटाळ्याची पाळेमुळे शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. आतापर्यंत दोन टीव्ही चॅनेलच्या मालकांसह दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी अभिषेक कोलवडे हा दहावा होता. त्याने रिपब्लिक टीव्हीने टीआरपी वाढविण्यासाठी पैसे दिल्याची कबुली दिली आहे.
क्राइम इंटेलिजेंस यूनिट (CIU) चे एसीपी शशांक सांडभोर आणि वरिष्ठ निरिक्षक सचिन वझे यांच्यासमोर अभिषेकने ही कबुली दिली. न्यूज नेशन चॅनलनेही टीआरपी वाढविण्यासाठी पैसे दिल्याचे त्याने म्हटले आहे. दोन्ही चॅनलकडून मिळणारी ही मोठी रक्कम काही सहकारी आणि काही लोकांना देण्यात येत होती. या लोकांच्या घरी बॅरोमीटर लावण्यात आले होते.
अभिषेकच्या दोन साथीदारांना पोलिसांना आधीच अटक केलेली आहे. इतरांचा शोध घेतला जात आहे. हंसा रिसर्च कंपनीने पहिल्यांदा या टीआरपी घोटाळ्याला वाचा फोडली होती. त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, नंतर पोलिसांच्या चौकशीत हंसा आणि रिपब्लिक टीव्हीशी संबंधित कंपनी ARG OUTLIER MEDIA PVT LTD मध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार झाले. मात्र, हंसाच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली नव्हती.
क्राइम इंटेलिजेंस यूनिटने ज्या आरोपींना अटक केली आहे किंवा जे फरार आहेत, त्यापैकी बरेचसे हे हंसाशी संबंधित आहेत. त्यांनी हंसाच्या गोपनीय माहितीचा आपल्या फायद्यासाठी दुरुपयोग केला. सीआययुच्या टीमने साक्षीदारांचे जबाबही घेतले आहेत. यांच्या घरी बॅरोमीटर लावण्यात आले होते. काही खास चॅनल पाहण्यासाठी त्यांना पैसे दिले जात होते. ते चॅनल पाहण्यात काही रस नसला तरीही ते चालू ठेवावे लागत होते. सीआययूने या प्रकरणी डझनभर साक्षी नोंदविल्या आहेत.
उमेश मिश्रा नावाचा आरोपी या माफीचा साक्षीदार बनला आहे. आतापर्यंत सीआययूने रिपब्लिकच्या पाच गुंतवणूकदारांना समन्स पाठविले आहेत. 30 ऑक्टोबरला त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. रिपब्लिक, न्यूज नेशनसह महामुव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनेलचीही चौकशी सुरु झाली आहे.