सोनभद्र (उत्तर प्रदेश) - सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे झालेल्या नरसंहारप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्रचे एसपी सलमान ताज पाटील आणि डीएम अंकीत अग्रवाल यांना तत्काळ प्रभावाने पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडात दहा आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज जमिनीच्या वादातून नरसंहार झालेल्या सोनभद्रमधील उंभा गावाला भेट दिली. त्यानंतर संवाद सधताना सांगितले की, उंभ हत्याकांड प्रकरणी डीएम, एसपी यांच्याबरोबरच आतापर्यंत एक एएसपी, तीन सीओ, महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सात राजपत्रित आणि आठ बिगर राजपत्रित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे."
दरम्यान, याप्रकरणी 1952 पासून आतापर्यंत जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.1952 पासून दीर्घकाळापर्यंत काँग्रेसच्या काळात समिती बनवून ग्रामसभेच्या जमिनीवर कब्जा करण्याचा खेळ खेळला गेला. यामध्ये अनेक बडे अधिकारी आणि नेते सहभागी होते. मिर्झापूर आणि सोनभद्रमध्ये खोटी सोसायटी बनवून 1 लाख हेक्टर जमिनीवर कब्जा करण्यात आला होता. आता या प्रकरणी एक समिती बनवण्यात आली असून, ती अशा प्रकरणांची चौकशी करेल, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे जमिनीच्या वादातून दहा आदिवासी शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी असलेल्या ग्रामप्रधानासह 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे.