लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे जिवे मारण्याची धमकी व्हॉटस्ॲप नंबरवरून मिळाली आहे. ‘तू दिल्लीमध्ये भेट, तुला एके ४७ ने उडवतो मूसेवाला टाइप. तू आणि सलमान फिक्स...’ अशा आशयाची ही धमकी असून, या प्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांना कळविल्यानंतर पुण्यातून राहुल तळेकर (वय २३) नामक स्टॉलचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी संजय राऊत यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये दिल्लीत आल्यास त्यांची एके-४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी याची माहिती पोलिसांना मिळताच काही तासांतच तळेकरला ताब्यात घेण्यात आले. पुण्यातील खराडी भागात तो चालवत असलेल्या जयशंकर हॉटेलमधून रात्री उशिरा मुंबई पोलिस आणि पुणे पोलिस गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली. तळेकरला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
फोन उचलला नाही म्हणून...
- प्राथमिक चौकशीमध्ये तळेकरने संजय राऊत यांना त्यांच्या मोबाइलवर फोन केला होता. मात्र त्यांनी तो फोन उचलला नाही; त्यामुळे रागाच्या भरात त्याने राऊत यांना धमकीचा मेसेज केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.- त्याचा कोणा राजकीय पक्षाशी संबंध असल्याचे उघड झालेले नाही. तसेच तळेकरला गुन्हेगारी पार्श्वभूमीही नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.- त्याचा बिष्णोई टोळीशी संबंध आहे का, याबाबत अजूनही तपास सुरू असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.- मात्र, या प्रकारानंतर कांजूरमार्ग पोलिस ठाण्यातही तक्रार करण्यात आल्याचे त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
निवाससस्थानी लावला बंदोबस्त
राऊत यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याआधीही राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या जिवाला धोका असल्याची माहिती दिली होती. बिष्णोई टोळीने अभिनेता सलमान खानला संपवण्याची धमकीही दिली आहे.