औरंगाबाद : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी हर्सूल कारागृहात अटकेत असताना मध्यप्रदेशातील आरोपी सरूफखान शकूर खान (४५, रा. खेडी, ता. कसरावद, जि. खरगोन, मध्यप्रदेश) याला जामिनावर कारागृहाबाहेर काढण्याचा सर्व खर्च इम्रान मेहदीने केला होता. त्याच्या या उपकाराचा मोबदला म्हणून ‘तुमने मुझे छुडाया, मै तुम्हे छुडाऊंगा ’असे सरूफने मेहदीला सांगितले होते. त्यानुसार तो साथीदारांच्या मदतीने पोलिसांवर गोळीबार करून मेहदीला पळवून नेण्यासाठी सोमवारी (दि.२७) शहरात दाखल झाला होता, हे समोर आले आहे.
सूत्रांनी सांगितले की, सरूफ खान शकू र खान हा शस्त्र तस्कर आहे. २०१६ साली त्याला गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यास सातारा परिसरात पकडले होते. याप्रकरणी सरूफविरोधात सातारा ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर तो एक वर्ष हर्सूल कारागृहात होता. या काळात त्याची ओळख इम्रान मेहदीसोबत झाली. त्यावेळी भाई ‘तुम मुझे छुडाओ, मै तुम्है छुडाऊंगा’ असा शब्द सरूफने इम्रानला दिला होता. त्यानंतर इम्रानने सरूफची जामिनावर सुटका व्हावी, यासाठी वकील मिळवून देण्यासोबत आर्थिक मदतही केली. त्यानंतर तो मध्यप्रदेशातील मूळ गावी गेला. मात्र अधूनमधून तो औरंगाबादेत येत असे.
इम्रानमुळेच आपल्याला जामीन मिळाला, यामुळे या उपकाराची परतफेड म्हणून त्याने इम्र्रानला पळवून नेण्याचा कट रचला. त्यानंतर तो कारागृहात जाऊन इम्रानला भेटला होता. काही दिवसांपूर्वी तो गावठी पिस्टल आणि काडतुसे आणि शार्पशूटरसह सात जणांना घेऊन मध्यप्रदेशातून औरंगाबादेत आला. स्थानिक चार जणांची त्याने मदत घेतली आणि कटाची आखणी केली. सुदैवाने खबऱ्याकडून या कटाची माहिती पोलिसांना चार दिवस आधीच मिळाली आणि पोलीस अलर्ट झाले.
( सुपारी किलर इम्रानला पळविण्यासाठी मध्यप्रदेशातून आले होते शार्प शुटर )
जेल ते दिल्ली गेट दरम्यान पोलिसांवर हल्ल्याचा कटसूत्रांनी सांगितले की, मध्यप्रदेशातून आलेल्या शार्पशूटर गँगने इम्रान मेहदीला सोडविण्यासाठी रचलेल्या कटानुसार ते हर्सूल जेल ते दिल्ली गेट दरम्यान पोलिसांवर गोळीबार करणार होते. त्यासाठी त्यांनी या मार्गाची रेकी केली होती. २७ रोजी रेकी करीत ते दिल्लीगेट येथे थांबले होते. त्याचवेळी तेथे असलेल्या साध्या वेशातील गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. एवढेच नव्हे, तर तेथे पोलीस असल्याचे आरोपींच्या लक्षात आले होते. यामुळे पोलिसांना चकमा देण्याच्या उद्देशाने आरोपी तेथून लगेच कटकटगेटच्या दिशेने आणि नंतर नारेगाव येथे गेले होते.
अटकेतील तीन आरोपींविरोधात गुन्हेसरूफ खानवर औरंगाबादेतील सातारा ठाण्यात २०१६ साली गावठी पिस्टल बाळगल्याचा गुन्हा नोंद आहे. तर नफीस खान मकसूद खानवर मध्यप्रदेशातील गोगावा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. फरीद खान आणि नकीब खानवर ट्रकचोरी आणि दरोड्याचे गुन्हे आहेत. तर नकीब आणि सरूफवर अहमदनगर येथेही गुन्ह्याची नोंद आहे.