बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली इथं पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुसाईड करण्यापूर्वी या युवकानं त्याच्या आईला मी कायमचा झोपायला चाललोय, मला उठवू नका असं म्हटलं. मुलाच्या बोलण्याचा अर्थ आईला कळला नाही. तो झोपायला गेलाय असं तिला वाटले. परंतु काही तासांनी आई त्याला उठवायला खोलीत पोहचली तेव्हा समोरील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. खोलीत मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिने पाहिला.
मृतक युवकाच्या कुटुंबाने या घटनेवरून सूनेवर गंभीर आरोप केले आहेत. २ दिवसांपूर्वीच राज पत्नी सिमरनला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. दोघेही देहारादूनच्या एका कार्यक्रमाला जाणार होते. परंतु सूनेच्या माहेरच्यांनी राजसोबत पत्नी सिमरनला पाठवण्यास नकार दिला. तिच्या भावांनी राजला मारहाण केली. दुसऱ्याच दिवशी माहेरच्यांनी सासरच्यांवर खोटा गुन्हा दाखल केला. युवकाच्या पत्नीने त्याला धमकीही दिली होती. पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट करत १०.३० पर्यंत तू जेलमध्ये जाशील, बेस्ट ऑफ लक असा मेसेज पतीचा फोटो लावून पोस्ट केला होता. महिलेने तिच्या पोलीस भावाला हाताशी धरून पतीला मारहाण केल्याचाही आरोप आहे.
१ वर्षापूर्वीच झालं होते लग्न
१ वर्षापूर्वीच राज आणि सिमरन यांचं लग्न झाले होते. सिमरन दिवसभर कुणाशी तरी बोलत राहायची. बऱ्याचदा कुटुंबातील सदस्य आणि पतीने समजावूनही तिने ऐकले नाही. पती राजने तिच्या घरच्यांनाही ही बाब सांगितली परंतु काहीच फायदा झाला नाही. लग्नानंतर या दोघांना १ मुलगाही आहे. ज्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तिथे सिमरनचा भाऊही तैनात आहे. त्याने राज आणि त्याच्या वडिलांना सर्वांसमोर मारहाण करत जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली होती.
७ जणांवर गुन्हा दाखल
राज आर्य याच्या आत्महत्येनंतर पत्नी सिमरनसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकाचा भाऊ सुरेशने याबाबत तक्रार देत पत्नी सिमरनसह भाऊ सागर, त्याचे आई वडील, बहिण-दाजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सागर हा बरेली पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत आहे. सासरच्यांनी मानसिक छळ केल्यामुळेच राज आर्य याने गळफास घेत जीवन संपवलं असा आरोप त्याच्या भावाने केला आहे.