डोंबिवली - गॅस सिलेंडर वितरणाचे काम करणा-या दिपक निकाळजे या 27 वर्षीय तरूणाला धमकी आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार संजय दत्त आणि अन्य तिघांविरोधात येथील मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तुला घरातून उचलून घेऊन जाईल, तू माझं भीषण रूप पाहिलेलं नाही मी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी धमकी दत्त यांनी मोबाईलवरून दिल्याचा आणि दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी रॉडने मारहाण केल्याची तक्रार निकाळजे याने केली आहे. मारहाणीचा प्रकार रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नोव्हेंबर 2021 मध्येही दत्त यांच्याविरोधात अन्य एका गॅस सिलेंडर वितरकाने कोंडून ठेवत मारहाण केल्याची तक्रार दिली होती.
त्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हयाची नोंद झाली होती. रविवारी पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान माजी आमदार दत्त यांनी निकाळजे याचे आरोप फेटाळले आहेत. आपणाविरूध्द खोटी तक्रार दाखल केल्याचे सांगताना निकाळजे कडून जादा पैसे उकळले जात असल्याबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. यात आमच्या गॅस एजन्सीची बदनामी होत होती त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले आहे. परंतू तो आता आमच्या अन्य कामगारांना काम करू नका असे दम देऊ लागला. त्याबाबत त्याला समजावले असता त्याने खोटी तक्रार दिल्याचे दत्त म्हणाले.