पणजी: अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करण्याच्या प्रकरणात पॉप स्टार गायक रेमो फर्नांडीसला पणजी बाल न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. सर्व आरोपातून त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीशी अत्यंत अर्वाच्छ शब्दात संवाद करण्याचे त्यांच्यावर पणजी बाल न्यायालयात आगशी पोलिसांनी आरोप ठेवले होते. या प्रकरणात अनेक सुनावण्या झाल्या होत्या व रेमो फर्नांडीस यांनी न्यायालयातही उपस्थिती लावली होती. गुरूवारी या प्रकरणात निवाडा सुनावताना न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. १ डिसेंबर २०१५ रेमो फर्नांडीस यांचा मुलगा जोनाह याच्या कारला पर्वरी - म्हापसा रस्त्यावर अपघात झाला होता. या अपघातात एक महाराषट्रातून आलेली अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्या पायाचे हाड मोडले होते. तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता रेमो फर्नांडीस यांनी त्या ठिकाणी जाऊन मुलीला शिविगाळ केल्याची तक्रार अॅड. आयरीश रॉड्रिगीश् यांनी तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी गोवा बाल कायदा कलम २ व ८ अंतर्गत वाईट वागणूक देणे व शिविगाळ करणे या आरोपांखाली गन्हा नोंदविला होता. नंतर त्याच कलमाखाली आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. ५३ पानी आरोपपत्रात २१ साक्षीदारांच्या साक्षीही नोंदविल्या होत्या. या साक्षिदारात आयरीश रॉड्रिगीश याचीही साक्ष होती. निरीक्षक उदय परब या प्रकरणाचे तपास अधिकारी होते. दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मूक्त केल्यानंतर आनंद व्यक्त करताना रेमो यांनी शेवटी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्याला बदनाम करण्याचे प्रयत्न फसल्याचे त्यांनी सांगितले.