वास्को - दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात असलेल्या ‘साई सर्व्हीस’ शोरुममध्ये विकण्यासाठी ठेवलेली नवीन चारचाकी घेऊन पोबारा काढलेल्या २१ वर्षीय तरुणाला सोमवारी (दि.८) संध्याकाळी वेर्णा पोलीसांनी गजाआड करून लंपास केलेली चारचाकी जप्त केली. या शोरुममध्ये ठेवलेल्या नवीन चारचाकीलाच चावी लावून ठेवलेली आहे व येथील सुरक्षा रक्षकाचे बरोबर लक्ष नसल्याचा फायदा उठवून त्या तरुणाने ही चारचाकी लंपास केल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी संध्याकाळी नुवे येथे राहणाºया कुलदीप सोनी या तरुणाला अटक केल्यानंतर त्या शोरुममधून चोरण्यात आलेली ‘मारुती ब्रीझा’ चारचाकी जप्त करण्यात आली. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती वेर्णा येथील चारचाकीच्या शोरुममध्ये आल्यानंतर त्यांने येथे नव्याने विकण्यासाठी ठेवलेली सदर चारचाकी घेऊन पोबारा काढला. याबाबत वेर्णा पोलीसांना माहीती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित ‘सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज’ व इतर प्रकारे माहीती मिळवून नंतर संध्याकाळी कुलदीप सोनी या तरुणाला गजाआड करून त्याच्याशी कसून चौकशी केली.पोलीसांच्या चौकशीच्या वेळी त्यांनी सदर चारचाकी चोरी केल्याचे मान्य करून चारचाकी चोरी करून ती लपवून ठेवलेली जागा पोलीसांना दाखवली. सदर चारचाकी जप्त करण्यात असल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली. पोलीसांनी जप्त केलेल्या या नवीन चारचाकीची किंमत ९ लाख १० हजार रुपये असल्याची माहीती पोलीसांनी दिली. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करित आहेत.