मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पेटीएमचे कर्मचारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने 100 दुकानदारांची 3 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. शाजापूरमध्ये गेल्या काही काळापासून पेटीएमचा एजंट असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने दुकानदारांशी संपर्क साधून त्यांना लोन स्कीम समजावून सांगितली. अनेक व्यावसायिकांनी लोन स्कीम रस दाखवला. अशा स्थितीत त्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले. काही हप्तेही जमा केले. मात्र नंतर ती व्यक्ती गायब झाली. यानंतर व्यापाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
व्यापाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर केलेल्या तक्रारीत व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे की, स्वतःला पेटीएमचा टीम लीडर म्हणून सांगणारा राहुल काही काळ सतत संपर्कात होता. राहुल सर्व व्यापाऱ्यांकडे स्वतंत्रपणे गेला आणि पेटीएमच्या नव्या स्कीमने त्यांची फसवणूक केली. यामध्ये राहुलने सांगितले की, पेटीएम खात्यावर कर्ज मिळत आहे.
या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जाची काही रक्कम ते स्वतःच्या वापरासाठी वापरू शकतात. तर उर्वरित रक्कम थेट एफडीमध्ये जमा केली जाईल. तुम्हाला या FD वर इतके व्याज मिळेल की दर महिन्याला कर्जाचे हप्ते जमा होतील. कर्ज पूर्ण झाल्यानंतर व्यापाऱ्यांना एफडीची रक्कम मिळेल. राहुलने सांगितलेल्या या योजनेमुळे शहरातील अनेक व्यावसायिकांची फसवणूक झाली. व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रे देऊन राहुलकडून कर्जाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली.
खात्यात कर्जाची रक्कम आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यातील काही रक्कम त्याने काढून घेतली आणि उर्वरित रकमेसाठी राहुलने एफडी करून देण्याचे बोलून रक्कम काढून घेतली. यानंतर काही हप्ते जमा केले, मात्र नंतर हप्ते जमा होणे बंद झाले. व्यापाऱ्यांनी राहुलशी संपर्क साधला असता तो बेपत्ता झाल्याचे समोर आले. सर्वत्र शोध घेऊनही राहुल सापडला नाही तेव्हा व्यापाऱ्यांना त्यांच्याशी झालेल्या फसवणुकीची माहिती मिळाली.
लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज
शहरातील अनेक जण अशा फसवणुकीला बळी पडले आहेत, मात्र त्यापैकी मोजक्याच जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तर अनेक लोक पोलिसांपर्यंत पोहोचलेच नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेक व्यावसायिक फसवणुकीला बळी पडले असून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.