राजगुरुनगर : भोरगड (ता. खेड) येथे देवदर्शनाला जात असताना २३ वर्षीय तरुणाचा धबधब्यावर पाय घसरून पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमीनाथ विठ्ठल तांगडे (रा. मुळ गाव. वडदतांगडा ता. भोकरदन ,जि. जालना) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजगुरुनगर येथे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून तांगडे काम करत होता. मंगळवारी तांगडे व त्याचा मित्र प्रदीप पावरा भोरगिरी येथे धबधबे पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी गेले होते. दुपारी २ च्या सुमारास तांगडे हा धबधब्याजवळ बसलेला होता. त्याचा मित्र प्रदिप शिवलिंंगाचे दर्शन घेऊन परत खाली येत असताना तांगडे धबधब्याच्या पाण्यात पडल्याचे लक्षात आले. तांगडे याला पोहता येत नव्हते. प्रदिप यांने तात्काळ हॉटेल मालकाला फोनद्वारे ही माहिती कळवली. सदर घटनेची बुधवारी सकाळी खेड पोलीस स्टेशनला माहिती दिली. यावेळी तात्काळ पोलीस घटनास्थळी जाऊन धबधब्याच्या पाण्याच्या डोहात पाण्यात लोखंडी पंजा, गळ दोरी बांबूच्या साह्याने तांगडे यांचा शोध घेत असताना तो मृत्युमुखी पडलेला अवस्थेत आढळून आला.तात्काळ पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. याबाबत खेड पोलिस ठाण्यात मयत तांगडे याचा मामा ज्ञानेश्वर पांडुरंग बोराटे यांनी फिर्याद दिली आहे.
भोरगिरी येथे धबधब्यावरून पाय घसरून तरूणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:13 PM