ठाणे : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चेतन कट्टीमंनी (रा. विजापूर, कर्नाटक) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच ठाण्यातील मासुंदा तलाव भागातून अटक केली. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील नौपाडा भागातील १५ वर्षीय मुलीशी इन्स्टाग्राममार्फत दोन महिन्यांपूर्वी चेतनची ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी मैत्री करून तिला धमकावत तिचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्यास भाग पाडले. नंतर हेच फोटो नातेवाईक आणि मित्रांना व्हायरल करण्याची धमकी देत तिला भेटण्यासाठी आग्रह धरला. तिने भीतीपोटी त्याचा हा आग्रह मान्य केला. कर्नाटकातून ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी आलेल्या या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही पुन्हा त्याने तिच्याकडे पैशांची आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. आता या प्रकारामुळे त्रस्त झाल्याने तिने अखेर आपल्या कुटुंबीयांना ही आपबिती सांगितली. तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी १६ फेब्रुवारी २०२२ रोजी लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पीडित मुलीला आरोपी चेतनबरोबर चॅटिंगद्वारे ठाण्यात येण्यास पोलिसांनी भाग पाडले. तो २३ फेब्रुवारीला ठाण्यात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद निकम, सहायक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस नाईक सुनील राठोड, समाधान माळी, जयेश येळवे, अमित पवार आणि गोरख राठोड आदींच्या पथकाने त्याला अटक केली. तो वारंवार फोन क्रमांकही बदलत असल्यामुळे त्याला पकडणेही पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते.