अकोला/मूर्तिजापूर : गतिमंद मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. या प्रकरणातील आरोपी युवकास पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्या न्यायालयाने मंगळवारी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
आरोपी प्रवीण ऊर्फ तुकाराम कपूरचंद चव्हाण (वय २४ वर्षे, रा. खंडला, ता. मूर्तिजापूर) याच्याविरुद्ध त्याच्या नात्यातील १० वर्षीय गतिमंद बालिकेवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केले आणि गैरमार्गाने तिचा गर्भपात केल्याचा आरोप होता. अन्य आरोपी त्याची बहीण दीपाली गोपाळ चव्हाण, गणपत जेजराव सोळंके व डॉ. दयाल रामजी चव्हाण यांनी गर्भपात करण्यास मदत केल्याचा आरोप होता. पीडितेचे आई-वडील कामाकरिता बाहेर गेल्यावर आरोपी प्रवीण ऊर्फ तुकाराम कपूरचंद चव्हाण हा पीडितेचे लैंगिक शोषण करायचा. पीडितेला पोटात दुखत असल्याने आरोपींनी पीडितेला दवाखान्यात नेले व तिच्या आई-वडिलांना खोटी माहिती देऊन गर्भपात करण्यासाठी त्यांची संमती प्राप्त केली. परंतु, पीडितेकडून आरोपीच्या दुष्कृत्याबाबत माहिती कळाल्यानंतर आरोपीविरुद्ध १८ जून २०१८ रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासणी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी प्रवीण ऊर्फ तुकाराम कपूरचंद चव्हाण हा फरार असल्यामुळे इतर आरोपींविरुद्ध खटला सुरू करण्यात आला. नंतर आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाने १९ जणांच्या साक्षी नाेंदविल्या. साक्षी व पुरावे ग्राह्य मानून पहिले न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३७६ (२) (एन) व पॉक्सो कायदा कलम ५-६ मध्ये १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावली. तसेच कलम ५०६ मध्ये ७ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, न भरल्यास १ महिन्याची अतिरिक्त शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ ॲड. मंगला पांडे, सहायक सरकारी विधिज्ञ ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली. पीएसआय संदीप मडावी व धनंजय रत्नपारखी यांनी प्रकरणाचा तपास केला होता.
पीडित मुलगी व वडील न्यायालयात फितूर
सदर प्रकरणातील मुख्य साक्षीदार म्हणजे पीडिता आणि तिचे वडील फितूर झाले. परंतु, त्यांनी पोलिसांना यापूर्वी दिलेला जबाब व अन्य साक्षी, पुराव्यांच्या आधारावर न्याय निवडा करण्यात आला.