बारामती : सावकारी व्याजाने पैसे वसुलीसाठी भीती घातल्याने एका युवकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना बारामती शहरात घडली.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार माळशिरस तालुक्यातील एकावर सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी लता दिलिप मोरे ( वय ५०, रा. बागडे वस्ती, ता. बारामती ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी मधुकर बबन काळोखे (रा. दहिगाव ता. माळशिरस जि.सोलापुर) यांना व्याज व मुद्दलापोटी विशाल याने त्यास वेळोवेळी पैसे देवून एकूण ४ लाख ८० हजार रुपये परत केले. त्यानंतर देखील आणखी पैसे देणेसाठी आरोपी काळोखे मुलगा विशाल यास धमकी देवून भिती घालत होता.त्या भिती पोटी विशाल मोरे याने १२ जुलै रोजी बारामती येथे विषारी औषध पिवून आत्महत्या केली. बारामती येथील देवळे पार्क येथे हा प्रकार घडला. काळोखे याने विशाल यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. सावकाराच्या भीतीपोटी विशाल याने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.अधिक तपास सहायक फौजदार संदीपान माळी करीत आहेत.