परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात शेतीच्या कामाचीही लगबग सुरु आहे. त्यासाठी बी-बियाणे आणि शेतीविषयक सामानाच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. अशाच शेतीकामाच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलिसांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या कानशिलात लगावून त्याच्यावर लाथ उगारणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अर्जुन पवार यांनी एका तरुणाला मुस्काटात मारून जाब विचारत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार हे परभणी शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात कर्तव्यावर तैनात होते. त्यावेळी त्यांनी एका तरुणाला रोखून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. हा तरुण गावातून शहराकडे शेतीविषयक साहित्य खरेदीसाठी आला होता. त्याला थांबवून API अर्जुन पवार यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. दुसरीकडे शेतीकामाची कोणतीही कामं-दुकानं बंद नाहीत, असं राज्यात ब्रेक द चेन लागू करताना मुख्यमंत्री यांच्याकडून सांगितलं होतं. तरीही पोलिसांकडून अशी लाथ उगारून मारहाण होत असल्याने नागरिकांत असंतोष व्यक्त केला जात आहे.
प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी रागाच्या भरात अर्जुन पवार यांनी त्या तरुणाला मारहाण केली. परंतु अशा पद्धतीने मारहाण करणे हे खेदजनकच आहे. याबद्दल आम्ही चौकशी करून कायदेशीर कारवाई करू, असं सांगितले आहे.