उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये २४ वर्षीय तरुणाने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवर लाईव्ह करताना तरुणाने हे सर्व केलं. मेटा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून उत्तर प्रदेशपोलिसांना तत्काळ अलर्ट पाठवण्यात आला आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करून तरुणाचा जीव वाचवला. १२ मिनिटांत पोलिसांनी ९ किलोमीटर अंतरावरील गावात पोहोचून तरुणाला रुग्णालयात नेलं.
एजन्सीच्या माहितीनुसार, भूडिया गावातील २४ वर्षीय तरुण गुरुवारी रात्री इनस्टाग्रामवर लाइव्ह आला आणि झोपेच्या गोळ्या घेत असताना बोलू लागला. मेटा सोशल मीडिया सेंटरने या व्हिडीओबाबत अलर्ट दिला आणि तत्काळ यूपी पोलीस मुख्यालयाला या प्रकरणाची माहिती दिली.
मेटाने रात्री ११.०५ वाजता पोलिसांना व्हिडीओ आणि लोकेशनसह हा अलर्ट पाठवला. यानंतर शाहजहांपूर पोलिसांना रात्री ११.१७ वाजता पोलीस मुख्यालयातून ही माहिती मिळाली. माहिती मिळताच तात्काळ कारवाई करत स्थानिक कटरा पोलिसांचं पथक अवघ्या १२ मिनिटांत ९ किलोमीटर अंतरावरील भूडिया गावात पोहोचले.
याबाबत एसपी राजेश एस म्हणाले की, गुगलने या रुटसाठी १६ मिनिटांचा अंदाज दिला होता, मात्र आमची टीम त्याआधीच पोहोचली. पोलिसांना हा तरुण घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ कटरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) नेण्यात आले, तेथे वेळेवर उपचारानंतर तो वाचला. उपचारानंतर तरुणाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या आई-वडिलांच्या टोमण्यामुळे नाराज झाला होता, त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी पोलिसांनी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांचंं समुपदेशन करण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणात पोलिसांना वेळीच माहिती देण्यात मेटाची भूमिका महत्त्वाची होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची रिअल टाईम अलर्ट यंत्रणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे.