नालासोपारा : लहान भावाला दारू पिऊन मोठा भाऊ मारत असताना शेजारी राहणारा तरुण भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या रागातून मोठ्या भावाने त्या तरुणाच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना शनिवारी रात्री विरार पूर्वेच्या खैरपाडा येथे घडली आहे. पत्नीच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी रविवारी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.खैरफाटा येथील संजय सिंग चाळीत राहणारा इस्माईल सय्यद हा नशेत लहान भाऊ इब्राहिम याला शनिवारी रात्री घरामध्ये मारत होता. आरडाओरडा झाल्याने शेजारी राहणारा दीपक लालदेव राय (३२) हा भांडण सोडवण्यासाठी गेला. याचाच राग धरून इस्माईलने शर्टात लपवून आणलेला चाकू दीपकच्या पोटात डाव्या बाजूला खुपसून गंभीर जखमी केले. त्याला उपचारांसाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याची पत्नी संध्या राय हिने आरोपीविरोधात रविवारी विरार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला.
भांडण साेडवण्यासाठी गेलेल्या दीपक राय याच्यावरच वार केले. इतरांच्या भांडणात नाहक त्याला दुखापत सहन करावी लागली आहे. याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.