लातूर : तालुक्यातील भाेईसमुद्रगा येथील २९ वर्षीय तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह साेमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ऋषीकेश रामकिशन पवार (२९ रा. भाेईसमुद्रगा ता. लातूर) असे मयत तरुणाचे नाव असून, याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे, पाेलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील भाेईसमुद्रगा येथील तरुण ऋषीकेश रामकिशन पवार हा नेहमीप्रमाणे शेतातील पत्राच्या शेडमध्ये रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झाेपण्यासाठी गेला हाेता. दरम्यान, साेमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास शेतात दूध काढण्यासाठी एक व्यक्ती गेला असता, शेडमध्ये ऋषीकेश पवार या तरुणाचा मृतदेह पूर्णत: जळालेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती एमआयडीसी पाेलीस ठाण्याला देण्यात आली. घटनास्थळी अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी भेट देवून पाहणी केली. पाेलिसांनी पंचनामा केला असून, लातूरच्या शासकीय व सर्वाेपचार रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, विठ्ठल संजय पवार यांनी दिलेल्या माहितीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. घटना नेमकी कशी घडली, यामागे घातपात आहे का? याचाही पाेलीस शाेध घेत आहेत. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक एस.एस. कराड करीत आहेत.
अहवालानंतर मृत्यूचे कारण हाेईल स्पष्ट...
शेतातील शेडमध्ये झाेपी गेलेल्या ऋषीकेश पवार या तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप समाेर आले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट हाेणार आहे. घातपाताचा संशय असेल तर त्या दिशेनेही पाेलीस तपास करतील, असे पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.