लंडन - एका बुक्कीतच हा संवाद देवमाणूस या मालिकेतील बजा या पात्राच्या तोंडून तुम्ही ऐकला असेल. मात्र प्रत्यक्षात एका बॉक्सरने किरकोळ कारणावरून मारलेल्या एका ठोशामुळे तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील नॉर्थ वेल्समध्ये पबमध्ये बसून मद्यपान करत असलेल्या एका बॉक्सरने तरुणाची ठासा मारून हत्या केल्याचे समोर आले आहे. या बॉक्सरने सदर तरुणावर एवढ्या जोरात ठोसा मारला की, त्याचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, पोस्टमार्टेम रिपोर्टमधून एक ठोसा सदर युवकासाठी कसा जीवघेणा ठरला याचा उलगडा झाला आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार २५ वर्षीय ब्रँडन सायलेंस नॉर्थ वेल्समधील एका पबमध्ये बसून मद्यपान करत होता. तेव्हा त्याने कुठलेही कारण नसताना २० वर्षीय डीन स्किलिन याच्यावर हल्ला केला. मात्र बॉक्सर असलेल्या ब्रँडन याने केवळ एकच पंच मारला. मात्र हा एक पंच डीनसाठी जीवघेणा ठरला. मिळालेल्या माहितीनुसार ब्रँडन याने डीन स्किलीनला मारलेल्या ठोश्यामुळे डीनचे डोके वेगाने फिरून मानेचे हाड मोडले. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर काही वेळातच डीन ब्रेन डेड झाला.
त्यानंतरत पोलिसांनी ब्रँडनला अटक केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कोर्टासमोर हजर केले. तिथे जबाब देताना त्याने आपला हत्या करण्याचा हेतू नव्हता, असे सांगितले. मी केवळ भांडण सोडवण्यासाठी गेलो होते. एका पंचमुळे त्याचा मृत्यू होईल, असे मला वाटले नव्हते, असे तो म्हणाला.
ब्रँडनने पोलिसांना सांगितले की, हा पंच केवळ एक इशारा होता. मी आक्रमक नव्हतो. मी कुणालाही दुखापत करण्याचा प्रयत्न केला नाही. मी दोघांना मारले होते. तसेच हा ठोसा केवळ इशारा म्हणून दिला होती. त्यात एक जण जमिनीवर पडला, तर एकजण उभा राहिला. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रँडन हा काही प्रोफेशनल बॉक्सर नाही आहे. त्याने आपल्या जीवनात एकही फाईट खेळलेली नाही. मात्र त्या दिवशी त्याच्या एका बुक्क्याने डीन स्कीलिन याचे प्राण घेतले.