वणी (यवतमाळ) : येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणा-या युवतीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पिडित युवती मंगळवारी रात्री ड्युटी आटोपून पायदळ घराकडे परत जात असताना वणीतील महाराष्ट्र बँक चौकात मागाहून आलेल्या पांढ-या रंगाच्या टाटा इंडिका कारच्या चालकाने तिला सुगम हॉस्पीटल कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर पिडितेने त्याला सुगमकडे जाण्याचा मार्ग सांगितला. मात्र तुम्ही पायदळ त्याच मार्गाने जात असाल तर गाडीत बसा. मला हॉस्पिटल दाखवा, असे सांगून कार चालकाने पिडितेला गाडीत बसविले. पिडिता वाहनात मागील सीटवर बसताच, चालकाने कारचे काच बंद करून साईमंदिर चौकातून, नांदेपेरा मार्गाने कार वळविली.
यवतमाळ बायबासवर पोहचल्यानंतर यवतमाळ मार्गाने पुढे १० किलोमिटर पुढे जाऊन एका निर्जनस्थळी कार थांबविली. पिडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने तिचा मोबाईलदेखील हिसकावून घेतला. त्यानंतर पुन्हा त्याने कार वणीकडे वळविली. नांदेपेरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर आणून तिला सोडून दिले व तो कार घेऊन पळून गेला.
याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३६६, ३७६ (१), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध घेतला जात आहे.