साक्री (जि.धुळे) : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीला गालबोट लागले असून, जमावाने केलेल्या मारहाणीत राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याच्या पुतणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलिस स्टेशनला ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याप्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसारसाक्री नगरपंचायत निवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यानंतर दुपारी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी गोटू जगताप या व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. दरम्यान रात्री ८ वाजेच्या सुमारास गोटू जगताप हा साक्री-पिंपळनेर पुलावरून जात असतांना त्याला काहींनी गाठत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी काकाला वाचविण्यासाठी आलेल्या पुतणी मोहीनी हिला जमावाने बेदम मारहाण केली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. राजकीय वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईकांनी साक्री पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन सुरू केल्याने, तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव घटनास्थळी दाखल झाले. बंदोबस्तासाठी एक एसआरपीचे प्लाटून तैनात करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.