- नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डोळ्यांत डोळे टाकून ती तुमच्या शेजारी येते. तुमच्या डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच ती कमाल दाखविते. रोख अन् माैल्यवान दागिने घेऊन ती तुमच्या डोळ्यांदेखत निघूनही जाते...
नागपुरात गेल्या काही वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि तपास यंत्रणेला हैराण करून सोडणाऱ्या या तरुणीला अखेर पोलिसांनी पकडले. त्यांनी चाैकशीत तिच्याकडून चोरीचे प्रात्यक्षिक करवून घेतले अन् तिची हातसफाई पाहून पोलीसही चक्रावले. नागपूर जिल्ह्यात राहणारी ही तरुणी अवघी २७ वर्षांची आहे. घरची आर्थिक स्थिती सधन आहे. तसेच ती डबल एम.ए. झालेली आहे. काही वर्षांपूर्वी तिला चोरीची सवय लागली अन् तिने शहरात धुमाकूळ सुरू केला.
गर्दीच्या ठिकाणी महिलेच्या पर्समधून रोख, दागिने लंपास करण्याचा तिने सपाटाच लावला. सारखेच गुन्हे वारंवार घडत असल्याने पोलीसही हैराण झाले होते. ही चोरी ती एवढ्या सराईतपणे करते की, संबंधित महिलेला चोरी झाल्याची बराच वेळ कल्पनाच येत नाही. तिने अशा प्रकारे तब्बल २० चोऱ्या केल्या आहेत.
ये आप नहीं समझेंगे...पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिला पकडले तेव्हा तिला चोरी करण्याचे व्यसन जडल्याचे उघड झाले. उच्चशिक्षित आहे, चांगल्या घरची आहे, मग कशाला चोऱ्या करते, असा प्रश्न तिला पोलिसांनी केला, तेव्हा तिने ‘आप ये नहीं समझेंगे’ असे धीरगंभीर उत्तर दिले. या क्षेत्रात बरेच पुढे जायची तिची महत्त्वाकांक्षा आहे. ती ‘चोरटी’ असल्याचे लक्षात आल्याने तिचे जुळलेले लग्नही यापूर्वी मोडले होते.
नुसतेच छानछोकीसाठी इंग्रजी, मराठीसह तीन-चार भाषांवर प्रभुत्व असलेली ही ‘उच्चशिक्षित चोरटी’ निव्वळ मौजमजेसाठी चोरी करते. पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा १९ चोऱ्यांमधील संपूर्ण रक्कम छानछोकीत उडविली होती. मात्र, चोरीचे सुमारे २० लाखांचे दागिने तिने घरात लपवून ठेवले होते. दागिने विकायला गेल्यास सराफ प्रश्न विचारेल अन् आपले बिंग फुटेल, अशी तिला भीती वाटायची. त्यामुळे ती दागिने एका डब्यात भरून ठेवत होती.
कानपूरचा गुरुमंत्र होस्टेलमध्ये राहणाऱ्या एका उच्चभ्रू तरुणीने तिला आठ वर्षांपूर्वी चोरीचा गुरुमंत्र दिला होता. काही महिने तिच्यासोबत चोरी केल्यानंतर हिस्सेवाटणीवरून त्या दोघीत वाद झाला अन् हिने नंतर स्वतंत्र दुकानदारी सुरू केली.