जळगाव : मला खूप मोठे व्हायचे आहे, परंतु कुटुंबातील सदस्य शिक्षण करु देत नाहीत. मला आयपीएस बनायचे आहे, मोठी नोकरी करुनच आता घरी परत येईल, असा व्हाईस मेसेज करुन चारुशिला जगदीश महाजन (१७) या मुलीने वसतीगृह सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सावखेडा खुर्द, ता.रावेर येथील शारदा जगदीश महाजन (३३) या मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली आहे. त्यांची मुलगी चारुशिला ही जळगाव शहरात शिक्षण घेत आहे. त्याशिवाय तिने खासगी क्लासही लावलेला आहे. लक्ष्मी नगरातील जयंत माधव राणे यांच्या वसतीगृहात ती वास्तव्याला होती.२८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता तिने मोबाईलवर व्हाईस मेसेज पाठवून कुटुंब शिक्षण करु देत नाही, मला आयपीएस व्हायचे आहे असे सांगून वसतीगृह सोडले. शेतकरी असलेल्या आई, वडिलांना हा प्रकार समजताच त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे तपास करीत आहेत.