खार येथे थर्टी फर्स्ट पार्टीत झालेल्या मारहाणीत एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जान्हवी कुकरेजा असे या २१ वर्षीय तरुणीचे नाव असून खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत पार्टीमध्ये सहभागी झालेल्या एका जोडप्याला अटक केली आहे.खारमधील भगवती हाईट्स या इमारतीच्या टेरेसवर गुरुवारी थर्टी फर्स्ट पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
इमारतीमधील रहिवाशी तसेच त्यांची काही जवळची मित्र मंडळी या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. जान्हवी पार्टीत सहभागी होण्यासाठी टेरेसवर पोहचली त्यावेळी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. जान्हवीने याबाबत आक्षेप घेतला आणि त्यांना हटकले. यावरून या जोडप्यासोबत जान्हवीचा वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनी तिला धक्काबुकी करण्यास सुरुवात केली. या जोडप्याने जान्हवीला मारहाण केली आणि केसाला धरून फरफटत दुसऱ्या मजल्यापर्यंत नेले, असे सांगण्यात येत आहे. फरफटत नेत असतानाच जान्हवीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.