पुणे/धनकवडी : प्रेम संबंधातून धारदार चाकूने वार करुन प्रेयसीचा खुन करण्यात आला. सपना दिलीप पाटील (वय ३२, रा. पवार हॉस्पिटलजवळ, धनकवडी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तिचा प्रियकर राम गिरी (वय ३८, मुळ रा. परभणी) याला अटक केली आहे. कात्रज नवीन बोगद्याच्या सुरुवातीला कोळेवाडी येथे रविवारी रात्री १० वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी भारती संजीवनी दत्ता देवकर (वय २९ ) यांनी भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत भारती विद्यपीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले की, संजीवनी देवकर आणि सपना पाटील या रिलायन्स मार्ट मध्ये हाऊस किंपिंगचे काम करत हाेत्या. तसेच धनकवडीतील बालाजीनगर परिसरात राहण्यास आहे.. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याचे सुमारास सपना आणि राम गिरी हे दाेघे जेवणाकरिता हाॅटेल मध्ये गेले हाेते. जेवण केल्यानंतर ते रात्री दहा वाजण्याचे सुमारास दुचाकीवरुन घरी परतत असताना, पुणेकडून साताराकडे जाणारे नवीन कात्रज बाेगद्याचे सुरुवातीस, काेळेवाडी येथे राम गिरी याने गाडी थांबवून सपनाचे पाेटात डावे बाजूस चाकूने तिच्यावर वार केला. त्यानंतर आरोपी पसार झाला हाेता. जखमी अवस्थेत सपना पाटील हिला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिचा मृत्यु झाला.
खुनाची माहिती मिळताच, पाेलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पाेलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पाेलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांनी घटनास्थळी भेट दिली व आराेपीचा शाेध सुरु केला. तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपीचा माग काढून त्यास ताब्यात घेण्यात आले असून खुनातील चाकू जप्त करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ पाेलीसांनी दिली. याबाबत सहाय्यक पाेलीस निरीक्षक अशिष कवठेकर पुढील तपास करत आहे.