अकोला - हिवरखेड पोलीस ठाण्यातर्गंत येणाऱ्या तळेगाव बाजार येथे घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करीत निर्घुण हत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी पोलिसांनी हरिदास गणेश मापे(३५) याला ताब्यात घेतले आहे. (Younger brother kills older brother in domestic dispute)
जागेच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची गावात चर्चा आहे. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे घरगुती कारणावरून शिवाजी गणेश मापे(४०) व हरिदास गणेश मापे(३५) यांच्यात गुरूवारी रात्री वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे आरोपी हरिदास मापे याने मोठा भाऊ शिवाजी मापे यांच्या छातीवर चाकूने वार करून त्याला जखमी केले. दोघेही भाऊ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजुला तळेगाव बाजार येथे राहतात. शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रस्त्यावर तब्बल दोन तास त्याचा मृतदेह पडून होता. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळावर गाठून मृतदेहाचा पंचनामा केला आणि आरोपी हरिदास मापे याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.
पोलीस पोहोचले दाेन तासांनंतर!तळेगाव बाजार येथे लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली. याबाबत ग्रामस्थांनी हिवरखेड पोलिसांना माहीती दिली. माहीती देऊनही पोलीस दोन तास घटनास्थळावर पोहोचले नसल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली. दोन तासानंतर पोलिसांनी गावात येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा ग्रामीण रूग्णालयात पाठविला.