मध्य प्रदेशातील दतियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मोठ्या भावाने लहान भावासह त्याच्या पत्नीचा खून केला आहे. त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. छोट्या भावाने आपल्या आधी लग्न केल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. (Elder brother murder of young brother and his wife.)
आरोपी असलेला मोठा भाऊ डिप्रेशनमध्ये होता. त्याच्या आधी त्याच्या छोट्या भावाचे लग्न झाले होते. यामुळेच त्याने ही हत्या केली आहे. दतियाचे एसडीओपी सुमित अग्रवाल यांनी सांगितले की, बेहरुका गावात राहणाऱ्या संतोष कुशवाहा याने त्याचा छोटा भाऊ किशन कुशवाहा आणि वहिनी प्रियंकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ते दोघेही झोपेत असताना संतोषने त्यांच्यावर हल्ला केला. कुऱ्हाडीचा वार एवढा जोरात होता की एकाच झटक्यात त्यांचा मृत्यू झाला.
जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा लोकांनी सांगितले की, संतोषच्या छोट्या भावाचे लवकर लग्न झाल्याने तो नेहमी त्रस्त असायचा. छोट्या भावाचे लग्न झाल्याने आता आपले लग्न होईल की नाही या चिंतेने त्याला ग्रासले होते. याच गोष्टीवरून तो नेहमी डिप्रेशनमध्ये रहाय़ला लागला. मात्र, या कारणावरून तो एवढा मोठा हत्याकांड करेल असे कोणाला वाटले नव्हते.
सुमित अग्रवाल यांनी सांगितले की, संतोष कुशवाहा हा हत्या करून तेथून पसार झाला. पोलिसांना कोणीतरी फोन करून त्याच्या ठिकाणाची माहिती दिली, यामुळे तेथून त्याला अटक करण्यात आली. हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.