पुणे : तुझ्यामुळे माझ्या पाठिमागे अपघात झाला आहे, असा बहाणा करीत एका तरुणाला १७ हजाराला लूबाडण्याचा प्रकार उघड झाला आहे. या तरुणाला एटीएम सेंटरमध्ये घेऊन जाऊन पैसे काढण्यास भाग पाडण्यात आले.
याप्रकरणी राहुल घ्यार (वय २४, रा. कर्वेनगर) या तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फियार्दीनूसार अज्ञात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल. घ्यार हा बुधवारी (२५ जुलै) रात्री डुक्करखिंड येथून दुचाकीवर चालला होता. यावेळी एका दुचाकीस्वाराने त्याला गाडी आडवी घालून थांबवले. त्यानंतर त्याला तुझ्यामुळे मागे अपघात झाला असून त्यामध्ये माझी मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. नुकसान भरपाई दे असे म्हणून त्याला जबरदस्तीने जवळच्या एटीएम सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे त्याच्या एटीएम कार्डमधून १७ हजार रुपये काढण्यास भाग पाडण्यात आले. हे पैसे घेऊन आरोपी निघुन गेला. थोड्या वेळाने फियार्दीने मागे जाऊन पाहिले तर तेथे कोणताच अपघात घडला नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. बी. माने करीत आहेत.