मुंबई: 'मै तुम्हारे बेटे का दोस्त हु, वो मुसलमान लडकी से शादी करनेवाला है, वो दोनो एक हॉटेल मे बैठे है, मै आपको वहा लेकरं चलता हु'...असे सांगत एका अनोळखी रिक्षाचालकाने वृद्धेचे अपहरण करत तिला लुबाडले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय देखील पोलिसांना असून याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ११ने शिताफीने तपास करत जिग्नेश जितेंद्र रजनी उर्फ जीवाला (३१) नामक अभिलेखावरील गुन्हेगाराला बुधवारी मालाडमधुन जेरबंद केले आहे.
बोरिवलीतील योगीनगरमध्ये घरकाम करणाऱ्या राधाबेन दहिसरमध्ये पती, मुलगा आणि सुनेसोबत राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरला त्या घरकाम संपवून दुपारी अडीचच्या सुमारास घराच्या दिशेने निघाल्या होत्या. बसस्थानकावर उभ्या असताना एक रिक्षाचालक त्यांच्याकडे आला. ज्याने स्वतःला राधाबेन यांच्या मुलाचा मित्र म्हणवत तो एका मुसलमान मुलीशी लग्न करत असल्याचे सांगितले. तेव्हा तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला त्या हॉटेलमध्ये घेऊन जातो जिथे ते दोघे बसले आहेत, असे त्या इसमाने त्यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्या इसमासोबत रिक्षातून निघाल्या. रिक्षाचालकाने दहिसरमार्गे रिक्षा घोडबंदरमार्गावर नेली. तिथे एका चहाच्या टपरीवर त्याने रिक्षा थांबवत दोघांसाठी चहा घेतला. तेव्हा राजेश कुठे आहे, अशी विचारणा राधाबेन यांनी त्याला केली. तेव्हा अजून थोड्या अंतरावर एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये दोघे आहेत, असे सांगत त्याने पुन्हा रिक्षा भाईंदर खाडीच्या पुढे नेत निर्जनस्थळी थांबवली.
त्याठिकाणी 'तुम्हारे पास जो भी है वो मुझे दो', असे सांगत त्याने राधाबेनना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी विरोध केला म्हणून त्यांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील जवळपास ३५ हजार रुपये किमतीचे दागिने त्याने हिसकावले. त्यानंतर राधाबेन यांना तिथेच सोडून तो पसार झाला. घाबरलेल्या राधाबेन यांनी घडलेला प्रकार रस्त्यावर येऊन एका तरुणाला सांगितला, जो त्यांना स्थानीक पोलीस ठाण्यात घेऊन गेला. पोलिसांनी राधाबेन यांना घरी सोडले आणि त्यानंतर याप्रकरणी एमचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 'राधाबेन यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय आम्हाला आहे. त्यांच्या अंगावर, गालावर चावल्याच्या खुणा आहेत, त्यानुसार याप्रकरणी बलात्काराचे कलमही आम्ही लावणार आहोत', असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
'साडीच्या रंगावरून पकडला आरोपी' !जीवाला याने राधाबेन यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना ज्या ज्या ठिकाणी नेले त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज कक्ष अकराच्या अधिकाऱ्यांनी पडताळून पाहिले. मात्र त्यामध्ये आरोपीबाबत काहीच 'क्लू' त्यांना सापडत नव्हता. अखेर सीसीटीव्हीमध्ये रिक्षातून दिसणारी पिवळ्या रंगाची आईची साडी राधाबेन यांच्या मुलाने ओळखली. त्यानंतर त्या रिक्षाचा क्रमांक पोलिसांनी मिळवत मालाड पूर्व परिसरात वाघेश्वरी झोपडपट्टीतून जीवाला ताब्यात घेण्यात आले.