मुंबई - महागडे मोबाईल फोन स्वस्त किंमतीत देतो अशी टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या माध्यमातून इंस्टाग्रामसारख्या सोशल साईटवर बोगस जाहिरात करून अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्याला शिवाजी पार्क पोलिसांनी जेरबंद केले आहे. आयफोनच्या प्रेमात पडलेल्या एका २१ वर्षीय तरुणीला अशा प्रकारे गंडवणारा मोहम्म्द अहमद मुमताज अहमद विरभाई (वय - २१) याला शिवाजी पार्क पोलिसांनी सुरतहून अटक केली असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.
इकडेतिकडे न फिरता, वेळ वाचवून आणि घरपोच वस्तू पोहोच करणाऱ्या ऑनलाईन वेबसाइट्सवर नागरिक विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागल्याचा फायदा आता चोरटे घेऊन लागले आहेत. इंटरनेटवर दाखवायची एक वस्तू एक आणि विक्री करायची दुसऱ्याच वस्तूची. त्यामुळे या खरेदी मार्गातील खाचखळगे लोकांना दिसू लागले आहेत. माहिमच्या एल.जे.रोड परिसरात राहणारा आकांक्षा सिंग (वय - २२) ही तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत रहाते. आकांक्षाचा मोबाईल खराब झाल्यामुळे ती इंटरनेटवर नवीन मोबाइलच्या शोध घेत होती. त्यावेळी इंस्टाग्रामवर एका अभिनेत्रीने आयफोनची जाहिरात करत replicedajucedtion.nexafashion.comed या वेबसाईटची लिंक शेअर केली होती. या लिंकवर आकांक्षाने आयफोनची किंमत १९ हजार ९०० रुपये पाहिली. कमी किंमतीत आयफोन मिळत असल्याने क्षणाचा ही विलंब न करता. आकांक्षाने तो मोबइल बुक करण्यासाठी १९०० रुपये आगाऊ दिले. त्यानुसार त्याच महिन्यात मोबाईलची डिलेव्हरी झाल्यानंतर आकांक्षाने उर्विरत १७९१० रुपये दिले. आकांक्षाने मोबाईलवरील पॅकिंग काढून फोन पाहिला असता. तो बनावट आयफोन असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी आकांक्षाने ज्या वेब साईटहून मोबाईल बूक केला होता. त्या साईटवरील आरोपी मोहम्म्द अहमद मुमताज अहमद विरभाईच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी विरभाईने तुम्हचे पैसे परत पाठवण्यात येतील असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर विरभाईने आकांक्षाला टाळण्यास सुरूवात केली. तसेच त्याचा मोबाईल ही बंद लागू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आकांक्षाने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
त्यानुसार पोलिसांनी संबधित वेबसाईटचा माग काढला असता. मो. अहमद मुमताज अहमद विरभाई हा सुरतचा व्यापारी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला या फसवणूकीप्रकरणी अटक केली आहे. विरभाई हा टीव्ही सिरियल्समध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना गाठून त्यांना आपल्या वेबपोर्टलची जाहिरात करण्यास सांगायचा आणि त्याचा मोबदला म्हणून ५० हजार रुपये देत असे. मोबदला मिळत असल्याने अभिनेत्रींनी शहनिशा न करताच त्याची जाहिरात करण्यास सुरुवात केली होती. मग ती जाहिरात पाहून नागरिक विरभाईला संपर्क साधत आणि नंतर त्यांची फसवणूक केली जात असे अशी माहिती कांदे यांनी दिली. अटक आरोपीविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.