आपण अनेकदा सेकंड हँड वस्तू विकत घेण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा वापर करतो. पण त्या ठिकाणी आपल्यासोबत काय घडेल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडलाय. OLX या ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी असलेली एक बाईक टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याच्या घेऊन फरार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, आपल्या गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
लखनौमधील मादियानव येथे राहणाऱ्या फरहत अब्बास यांनी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. वास्तविक, तक्रारदाराने आपली बाईक विकण्याची जाहिरात ओएलएक्स या ऑनलाइन वेबसाइटवर टाकली होती. त्याला पाहून अनुभव वर्मा नावाच्या तरुणाने ती खरेदी करण्यासाठी संपर्क साधला आणि त्यानं बाईकची टेस्ट ड्राइव्हची मागणी केली. यानंतर, ग्राहक बनून अनुभव फरहत यांच्याकडे पोहोचला. त्या ठिकाणी त्यानं बाईक टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली घेतली आणि घेऊन पळून गेला.
दरम्यान, बराच वेळ फरहत त्याची वाट पाहत थांबले होते. परंतु नंतर अनुभवशी त्यांनी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर तो स्विच ऑफ लागला. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत शोधमोहिम सुरू केली आणि अनुभव याला अटक केली. आपल्या गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी आपल्याकडे बाईक नव्हती आणि पैसेही नव्हते. तर ओएलएक्सवर असलेल्या बाईक टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्यानं घेतली आणि पळ ठोकल्याचं आरोपीनं पोलिसांच्या चौकशीत सांगितलं.