अयोध्या - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ५ दिवसांत बॉम्बनं उडवून टाकू अशी धमकी देणाऱ्या २२ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियात आदित्यनाथ यांना दिलेल्या धमकीनं पोलीस यंत्रणेत खळबळ माजली. त्यानंतर तातडीने या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. सध्या या युवकाची चौकशी सुरू असून युवकाच्या जबाबानंतर पोलिसही हैराण झाले आहेत.
बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास एका युजरनं त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ५ दिवसांत बॉम्बनं उडवून टाकू अशी ही पोस्ट होती. त्यानंतर ही पोस्ट व्हायरल होत पोलिसांकडेही पोहचली. तातडीनं पोलिसांनी दखल घेत गुप्तचर यंत्रणा आणि इतर तपास संस्थांना अलर्ट दिला. काही तासांत धमकी देणाऱ्या युवकाची ओळख पटली. पोलिसांच्या पथकाने आरोपी युवकाला त्याच्या राहत्या गावातून अटक केली. आरोपी युवकाचं नाव अनिरुद्ध पांडेय असं आहे.
पोलिसांनी आरोपी युवकाला ताब्यात घेत चौकशी केली त्यातून जे समोर आलं त्यामुळे सगळेच हैराण झाले. प्रसिद्धी मिळवण्यासाठी युवकाने सोशल मीडियात मुख्यमंत्र्यांना धमकी देणारी पोस्ट टाकली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला असता त्यात अनिरुद्धनं युट्यूबवर धमकी देण्याचे प्रकार असे व्हिडिओ पाहिले होते. त्यानंतर ही पोस्ट टाकली.
दरम्यान हा आरोपी एका खासगी कॉलेजमध्ये एलएलबीचं शिक्षण घेत आहे. तो एलएलबीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. सराय इनायकच्या मलावा गावातील हा रहिवासी असून त्याने प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियात टाकली. या आरोपी युवकाने सोशल मीडियात पोस्ट करताना लिहिलं की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ५ दिवसांत बॉम्बनं उडवून टाकू. त्यानंतर ही पोस्ट त्याने यूपी पोलीस, एसटीएफ यांनाही टॅग केली. पोलिसांकडे ही पोस्ट पोहचताच त्यांनी आरोपी युवकाचं लोकेशन ट्रेस केले आणि त्याला अटक केली.