मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये रात्री उशिरा एका तरुणाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. दोन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या समाजातील असल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला आहे. गैरसमजातून मारहाणीची घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौचंदी परिसरातील झैदी फार्ममध्ये राहणारा कासिम सोमवारी रात्री घरी परतत होता. यावेळी झैद फार्मच्या शेजारीच असलेल्या शास्त्री नगरमधील काही तरुणांनी त्याला अचानक मारहाण केली. याची माहिती मिळताच आसपासचे लोक जमा झाले. त्यांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. प्रकरण दोन वेगळ्या धर्मांशी संबंधित असल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
शहराचे पोलीस अधीक्षक विनीत भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांचा एका तरुणासोबत वाद झाला. तरुणांनी त्याला मारहाण केली. मी पुन्हा येईन आणि बदला घेईन, अशी धमकी देऊन तरुण तिथून निघून गेला. थोड्याच वेळात तिथून कासिम नावाचा तरुण जात होता. आपल्याला धमकी देऊन गेलेला हाच तो तरुण असल्याचं तरुणांच्या गटाला वाटलं आणि त्यांनी कासिमला मारहाण करण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या हल्ल्यानं कासिम गांगरला. काही कळण्यापूर्वीच तरुणाच्या गटानं त्याला मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कासिमच्या कुटुंबीयांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कलम ३०८ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला.