लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राखीपौर्णिमेला भावाच्या हाती बहीण मायेचा धागा बांधते. पण, हा आनंदी क्षण सोडून भावाने बहिणीच्याच डोळ्यात अश्रू आणले. मेरिटचा विद्यार्थी असलेल्या एका युवकाने राखीचा सण आगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी रविवारी पहाटेपर्यंत तयारी केली. मात्र, घरची मंडळी झोपल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसीतील लक्ष्मी पार्क सूतगिरणी (वाघधरा) परिसरात रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे समाजमन सुन्न झाले.
प्रद्युम्न मयुरेश चेंडके (१९) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्रद्युम्न अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याने मेरिटचे गुण मिळवत सीए (फाऊंडेशन)चा अभ्यासक्रम केला होता. त्याचे वडील घरातच स्टेशनरी मार्ट चालवितात तर आई प्राध्यापक आहे. त्याला एक १५ वर्षांची बहीण आहे. त्याने राखीचा सण आगळ्या पद्धतीने साजरा करू, असे म्हणत आई आणि बहिणीसोबत रविवारी पहाटे २.३० पर्यंत घराची साफसफाई केली. त्यानंतर आई, बहीण आणि वडील झोपल्याचे लक्षात आल्यानंतर रुमचे दार आतून लावून घेत आत्महत्या केली. गळफास लावल्यानंतर काहीतरी पडल्यासारखे झाल्याने घरच्यांना जाग आली. त्यामुळे त्यांनी प्रद्युम्नच्या रूमच्या दाराजवळ येऊन बघितले. त्याने दारासमोर एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात त्याने हा दरवाजा आतून बंद आहे. मागचे दार उघडे आहे, असे इंग्रजीत लिहून ठेवले होते. परिणामी घरच्यांनी बाजूच्या गल्लीतून डोकावून बघितले तेव्हा प्रद्युम्न गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. आरडाओरड करीत त्यांनी त्याला खाली उतरवले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. प्रद्युम्नने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.
बहिणीचा आक्रोश, शेजारीही हळहळलेपहाटेपर्यंत राखीसोबतच बहिणीचे लग्न धुमधडाक्यात करण्याची गोष्ट करणाऱ्या प्रद्युम्नने अशा पद्धतीने घरच्यांशी कायमचे नाते तोडल्याने चेंडके कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याची छोटी बहीण राखी घेऊनच आक्रोश करत होती. तिची अवस्था पाहून आजूबाजूच्या मंडळींनाही शोक अनावर झाला होता.