मुंबई - काल मंगळवारी राकेश जगताप (वय 30) दुपारी 3 च्या सुमारास करी रोड रेल्वे स्थानकात दुदैवी घटना घडली. ती सुद्धा आईसमोरच. त्यामुळे पोटचा गोळा लोकलखाली गेल्याने तिच्या काळजाचे तुकडे झाले.
काल राकेश हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला कामानिमित्त गेला होता. त्यानंतर बराच वेळ उलटून गेला तरी राकेश घरी आला नसल्याने त्याच्या आईला मित्रांनी तो करी रोड रेल्वे स्थानकात असल्याचे सांगितले. माहिती मिळताच आईने रेल्वे स्थानकात धाव घेतली. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या राकेशसोबत आई फलाट क्रमांक 2 वर चर्चा करत होती. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल जात फलाटावर येत असताना तो तोल जाऊन लोकलखाली गेला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून डावा हात तुटून पडला होता. अपघातस्थळी पोलिसांनी धाव घेत त्याला केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा काल रात्री 1.30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. राकेश करी रोड रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या राजगड या इमारतीत राहत होता. लोअर परळ पुलावर तो व्यवसाय करत असे. त्याला अजून दोन भाऊ असून तो थोरला भाऊ होता. वडील काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाले ते घरी आलेच नाही, त्यामुळे आईची आणि लहान भावंडांची जबाबदारी त्याच्यावर होती.