जळगाव : आई बाजारात असताना घरी कोणी नसल्याचे पाहून पंकज उखर्डू खाचणे (वय २७) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजता गोपाळपुरात उघडकीस आली. पंकज याने आत्महत्येपूर्वी पंकज याने चिठ्ठी लिहिली असून पत्नी, शालक, पोलीस असलेले सासरे व सासू यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा वेल्डींगचे काम करायचा. पत्नी चंचल ही दीड वर्षाच्या मुलासह दिवाळीला माहेरी गेली आहे. वडिलांचे निधन झालेले आहे, त्यामुळे घरी आई कल्पना व पंकज असे दोघंच होते. आई बळीराम पेठेत भाजी विक्री करते. दुपारी बारा वाजता घरी आली असता दरवाजा आतून बंद होता.
ठोठावल्यारही प्रतिसाद मिळत नसल्याने बहिणीचा मुलगा जयेश हेमराज पाटील (रा.तळेले कॉलनी) याला घरी बोलावून घेतले. शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकज याने गळफास घेतल्याचे दिसले. यावेळी दीड पानांची चिठ्ठी तेथे आढळून आली. शनी पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जीएमसीत हलविला. तत्पूर्वी ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.