पुणे : दोन वर्षांपूर्वी पत्नीने आत्महत्या केलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत वारंवार होणा?्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी धानोरीत घडली. संबधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर शनिवारी दुपारी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.शरद शिवाजी गुंजाळ (वय.४०,रा.भैरव नगर, धानोरी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शरद गुंजाळ हा धानोरीत राहत होता. २००७ साली त्याचा रंजना हिच्याशी विवाह झाला होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या करून जीवन संपविले होते.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.त्यावेळी रंजना हिचा भाऊ सचिन हा नंतर गुंजाळ यांच्या विरोधात तक्रार देणार असल्याचे सांगितले होते.रंजना गुंजाळ हिच्या अकस्मात मृत्यूची निर्गती करण्यासाठी पोलीस पती शरद गुंजाळ याला वारंवार फोन करून बोलवत होते.कामामुळे येणे शक्य नसून वेळ मिळाल्यावर येईल,असे उत्तर गुंजाळ त्यांना देत होता.चौकीत आला नाही तर पत्नीच्या गुन्ह्यात तुझ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिस त्याला देत होते.गुंजाळ हा १० फेब्रुवारी रोजी चौकीत आल्यावर त्याला बसवून ठेवण्यात आले. तुझ्या मेव्हण्याची अजून तक्रार आली नसल्याचे सांगून घरी पाठविले. पोलिस पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सतत धमकी देत असल्याने या त्रासाला कंटाळून शरद गुंजाळ याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलीसांच्या त्रासाला कंटाळून शरद गुंजाळ याने आत्महत्या केलीअसल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. पोलिसांनी अखेर वडील शिवाजी गुंजाळ यांचा तक्रार अर्ज घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.शरद गुंजाळ याच्या पश्चात वडील,भाऊ आणि दोन मुले आहेत. शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
"पत्नीच्या आत्महत्ये प्रकरणी मेव्हणाचा जबाब घेण्यासाठी शरद गुंजाळ याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते.पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून गुंजाळ याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिली.